Login

"काय माझा गुन्हा...?" भाग १८

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग १८



गौरवीचा भुतकाळ...


गौरवी रमेश गायकवाड…
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली, आणि मुंबईच्या लालबाग–परळच्या अरुंद चाळीत वाढलेली एक हिरकणी...

गौरवीची आई सुमती एक साधी गृहिणी...
घर, संसार आणि मुलांची स्वप्नं सांभाळणारी एक स्त्री...

तर वडील रमेश एका खाजगी बँकेत कारकून पदावर...
मर्यादित पगारात मोठी स्वप्नं पेलणारे घराचा कर्ता पुरुष...

आणि एक गोडसा लहान भाऊ... गौरवीचा लाडका सुजय...
इयत्ता पाचवीत शिकणारा, ज्याच्या डोळ्यांत अजूनही बालपणाची निरागस चमक झळकत होती...

सकाळची घाईगडबड सुरू होती...

“आई… मी चालले कॉलेजला...! आज कॉलेजचा पहिलाच दिवस आहे... उगाच उशीर व्हायला नको... लवकर दे ना टिफीन…”
ती पायात सॅन्डल पटपट घालत म्हणाली...

“अगं थांब ग दोन मिनिटं…”
आईने स्वयंपाकघरातूनच आवाज दिला...

“किती ग ही घाईगडबड तुझी कायमची...!” आई स्वयंपाकघरातूनच बोलत होती...

“आई, दोन मिनिटं सुद्धा थांबायला वेळ नाहीये माझ्याकडे...
बस चुकली ना तर पायीच जावं लागेल... त्यात टॅक्सीचं भाडं सुद्धा वाढलंय… आणि ते आपल्याला परवडणारं नाही...”
गौरवी दारात उभी राहून घाईघाईत म्हणाली...

“आई मी काहीतरी बाहेरच खाईन, तुला चालेल ना...?”
गौरवी हसतच म्हणाली, पण त्या हसण्यात एक जबाबदारी होती...

“ऐ, थांब...!”
आईने चिडून पण काळजीने भरलेला आवाज काढला...

“पायाला काय चाकं बिक लावली आहेत का ग तुझ्या...? बघावं तेव्हा नुसती पळतच असतेस...  जेव्हा शाळेत जात होतीस तेव्हाही हीच घाई… आणि आता मोठी झालीस आणि कॉलेजला जायला लागलीस, तरी तुझ्यात काहीच बदल नाही..."

आई जवळ येते व हातात टिफीन बॉक्स देत म्हणते...
“ मला कळतय... तुझी धडपड..., कि ही तुझी घाईगडब नाही गं, तर ही तुझी स्वप्नं आहेत… आणि ती पुर्ण करण्यासाठी तुला वेळेवर पोचायला धडपडतायत... पण लक्षात ठेव… तु एकटी नाहीस... आम्ही आहोत तुझ्या सोबत..."

तेवढ्यात वडील सुद्धा कामावर जाण्यासाठी तयार होऊन आपल्या खोलीच्या बाहेर येतात आणि गौरवीला शुभेच्छा देतात... तेव्हा गौरवी आपल्या वडिलांच्या पाया पडते... तर छोटा भाऊ या सगळ्यांचा गडबड गोंधळाचा आवाज ऐकून डोळे चोळत उठतो व आपल्या ताईला बेस्ट ऑफ लक म्हणून एक गोड पापा देतो...

गौरवी तशीच दारात क्षणभर थांबली… आणि आईकडे पाहून हसली… तीला एक घट्ट मिठी मारत... आणि टिफीन घेत दाराबाहेर पडली...

एका नव्या आयुष्याच्या पहिल्या पायरीवर पहिलं पाऊल टाकायला...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."